प्राणसई या कवितेचे रसग्रहण

मराठीतील प्रख्यात कवयित्री इंदिरा संत यांनी पाऊस पडण्यापूर्वीची ग्रामीण मनाची सर्व अस्वस्थता 'प्राणसई' या कवितेमध्ये भावोत्कर शब्दांमध्ये साकारली आहे. आभाळात दाटलेल्या काळ्या ढगांना त्यांनी प्राणप्रिय सखी मानून या प्राणसईशी त्यांनी हृदय-संवाद साधला आहे. कडक उन्हाळ्यामुळे झालेली घरादाराची व परिसराची वाताहत. शेतकऱ्याचे पावसासाठी व्याकुळ होणे व आतुरलेल्या मनाची तडफड ही या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. कवयित्रींनी स्वत:ला मेघमालेची मैत्रीण मानले आहे व मैत्रीच्या नात्याने मेघमालेला मनापासून विनवणी केली आहे.

अष्टाक्षरी छंदात गुंफलेली कविता ही यमक प्रधान असून, अत्यंत । साध्या शब्दकळेत मनातील भाव साकार करण्याची किमया कवयित्रींनी सहजगत्या साधली आहे.

स्थूलमानाने कवितेचे दोन भाग पडतात. पहिल्या पाच कडव्यांत पावसाअभावी झालेल्या दुर्दशेचे चित्र प्रत्ययकारी शब्दात रंगवले आहे. नंतरच्या कडव्यांतून 'प्राणसई' धरतीवर आल्यावर तिचे स्वागत कसे केले जाईल, याचे वर्णन उत्फुल्ल व प्रसन्न शब्दशैलीत साकारले आहे. उन्हाचा तडाखा सांगताना कवयित्रींनी 'विहिरीच्या तळीचे भिंग' ही सार्थ प्रतिमा वापरली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची स्थिती 'ठाणबंद बैल' या प्रतिमेत प्रत्ययकारी ठरली आहे. तसेच पावसाच्या आगमनाचे स्वागत करताना 'स्वप्नांवर पांघरलेला हिरवा शेला' ही समर्पक प्रतिमा योजली आहे. त्यातून आर्ता आणि आनंद यांचा उत्तम मेळ साकारला आहे.
आर्तता, भावपूर्णता नि उत्कटता हे या कवितेचे स्थायीगुण आहेत. प्रसाद आणि माधुर्य हे काव्यगुण दिसून येतात. साध्या पण संपन्न शब्दकळेमुळे या कवितेतील भाव रसिकांच्या काळजाला थेट भिडतो. म्हणून अष्टाक्षरी छंदातील ही नादमय कविता मला खूप आवडली आहे.